‘आम्ही एकमेकांचे दुष्मन नाही, आम्ही विरोधक झालोत’; अजित पवारांचं विधान
![Ajit Pawar said that we are not enemies of each other, we have become opponents](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Ajit-Pawar-3-780x470.jpg)
मुंबई | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार अधिवेशनाच्या दरम्यान जयंत पाटील यांना चेंबरमध्ये भेटतात. त्यामुळे काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. यावरून, आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही फक्त एकमेकांचे विरोधक झालो आहोत. ही वस्तुस्थिती आहे, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार म्हणाले, आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या आहेत. काही गोष्टी घडतात. त्यात नवीन काही नाही. आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. तसेच अधिवेशनाचाही शेवटचा दिवस आहे. आम्ही आमचे आमदार आणि आमचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार असे आम्ही सर्व एकत्र असून आमचे दोन्हीही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
हेही वाचा – ‘बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर, त्याला कमजोर समजू नका’; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले, अशा चर्चा कशाला कोण करेल? खरं सांगू का? आजकाल लोकांना बोलायला काही विषय नाही. त्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना गैरसमज निर्माण करायचा. पण असं काहीही नाही. ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार गटातील काही आमदार जयंत पाटील यांना चेंबरमध्ये भेटतात. त्यामुळे तुमचे काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. यावर अजित पवार म्हणाले, मला माझ्या आमदारांवर भरोवसा आणि विश्वास आहे. त्यामुळे या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही पूर्वी एकत्र असताना उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसायचो. आजही त्या ठिकाणी सर्वजण एकत्र जेवणासाठी बसतात. तेथे जयंत पाटील हे देखील येतात. आज जयंत पाटील मला भेटले तर आम्ही एकमेकांना नमस्कार करतोच. शेवटी महाराष्ट्राची ती पंरपरा आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही फक्त एकमेकांचे विरोधक झालो आहोत. ही वस्तुस्थिती आहे, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.