#CoronaVirus : मोनो, मेट्रो बंद, अनेक लोकल-एक्सप्रेस गाड्याही रद्द, घराबाहेर पडू नका!

पुणे | महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ,रत्नागिरी, औरंगाबाद, उल्हासनगर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली.
या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान आणि कार्यालयांना टाळं लावलं आहे. तर सरकारी कार्यालयात 25 टक्के कर्मचारी उपस्थित आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (22 मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा केली. देशभरात उद्या (22 मार्च) सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.
मेट्रो आणि मोनो बंद
या जनता कर्फ्यूदरम्यान संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान आणि कार्यालय उद्या बंद असणार आहेत. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वेच्या लोकलच्या फेऱ्याही उद्या कमी असणार आहेत. तसेच मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवाही उद्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर 2400 एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनही रद्द केल्या आहेत. आतापर्यंत मुंबईहून जाणाऱ्या 12 एक्सप्रेस ट्रेन आणि 4 लोकल रद्द केल्या आहेत.
एसटीच्या बसेसही रद्द
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बसेस डेपोतच असणार आहे. पुण्यातील स्वारगेट शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच्या साधारण हजार गाड्या उद्या रस्त्यावर धावणार नाहीत. सध्या स्वारगेट आणि शिवाजीनगरच्या 50% फेऱ्या घटवल्या आहेत. यात नियमित 2600 फेऱ्यांपैकी फक्त 700 फेऱ्या होणार आहे. जर प्रवाशांची मागणी वाढली तर बस सोडल्या जाणार आहेत.
‘या’ लोकांना बाहेर पडण्यास परवानगी
जनता कर्फ्यूदरम्यान कोणत्याही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान कोणताही नागरिक सोसायटी किंवा पार्कमध्ये फिरु शकणार नाही. मात्र जर कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली तर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यादरम्यान कोणत्याही रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्यात येणार नाही.
जनता कर्फ्यूदरम्यान पोलीस, मीडिया, डॉक्टर, साफ-सफाई कर्मचारी या लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. या व्यक्तींना पंतप्रधान मोदींनी घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे.
मुंबईत काय सुरु राहणार?
सरकारी आणि खासगी रुग्णालय
औषधं दुकाने
किराणा दुकाने
दूध डेअरी
सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी )
रेल्वे, बेस्ट बस
मुंबईत ‘या’ सुविधा बंद?
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद
मोठे मॉल बंद
जिम , जलतरण तलाव
सिनेमागृह
मुंबई पुणे ट्रॅव्हल बंद
खासगी कम्पन्या बंद
शाळा कॉलेज
मोठ्या चौपट्या बंद
उद्यान बंद
लग्नाचे हॉल काही प्रमाणात बंद
मच्छीमार्केट बंद
मुंबईतील छोटी मोठी मंदिरे बंद





