नवाब मलिक अजित पवार की शरद पवार गटात? अजित पवारांचं सूचक विधान
![Ajit Pawar said that Nawab Malik is determined to take his own decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Nawab-malik-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरूवात होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना मिश्किल शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. यावेळी नवाब मलिक नेमके कुठे? असा सवाल विचारला असता अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
नवाब मलिक नागपुरात अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका गट कोणता? असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते आमदार आहेत. ते स्वत:चा निर्णय घ्यायला खंबीर आहेत. सभागृहात कुणी कुठे बसायचं हे ठरवायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घटना घडल्या हे सगळ्यांना माहिती आहे. आज नवाब मलिक आले आहेत. मी सकाळी त्यांना फोन केला होता, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार?
जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पोट वाढलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यावरून टोला लगावला होता. यावरून अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. काल तर काही वाहिन्यांनी एकदा माझं पोट दाखवलं, एकदा जितेंद्रचं पोट दाखवलं. कुणाची पोटं दाखवून महाराष्ट्रातले प्रश्न, आत्ताच्या समस्या सुटणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अवकाळीचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न असे इतर अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल चर्चा होणं, त्यावर कसा मार्ग काढता येईल याला महत्त्व दिलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.