अजित पवारांचे राज्य सरकारला आणखी एक पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
![Ajit Pawar has demanded to establish a financial development corporation for artists](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/eknath-shindedevendra-fadnavis-and-ajit-pawar--780x470.jpg)
मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहंल आहे. या पत्रात अजित पवार यांनी कलाकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांसाठी निवास, भोजन, औषधोपचारांची सोय, वृध्दाश्रम सुविधा तसंच त्यांना अल्पव्याजानं कर्ज, मुलांच्या शिक्षणाची सोय, शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.
राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तमाशाकलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. लोककलावंतांच्या वाट्याला येणारं हे दुःख टाळण्यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीनं घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचं कामकाज लवकरात लवकर सुरु करुन लोककलावंतांना दिलासा द्यावा, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.