Ajit Pawar death Controversy | अजितदादांनी पाणी पिण्याची बॉटल का बदलली?
घातपात होणार याची शंका आली होती का? : आमदार रोहीत पवार यांचा खळबळजनक दावा
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी आज अजित पवारांचा अपघात की घातपात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विमान कंपनी, डीजीसीए यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०२३ चा मुंबईतील या कंपनीच्या विमान अपघाताचा अहवाल दाबला नसता तर आज अजित पवार जिवंत असते, असा आरोप रोहित यांनी केला आहे. तसेच आपल्याला घातपातच जास्त असल्याची शंका येत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या काही गोष्टी अपघातानंतर सापडल्या. त्यात त्यांचा जळालेला स्वेटर, घड्याळ होते. या घडाळ्यात ९ वाजले होते, असे रोहित पवार म्हणाले. विमान अपघात 8.43-8.45 या कालावधीत झाला तर मग अजित पवारांच्या मनगटातील घड्याळामध्ये ९ का वाजलेले होते, असा सवाल करत त्यांनी या शंकेचे निरसन केले. “अजितदादांचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे, पण अपघातात ते बरोबर ९ वाजता बंद पडले,” असे रोहित पवार म्हणाले.
“ती बॉडी दादांची नसावी…”
अपघातानंतरचे सहा दिवस रोहित पवारांसाठी अत्यंत क्लेशदायक होते. “घटनास्थळी जो मृतदेह सापडला, तो पाहून माझं मन मानायला तयार नव्हतं की ते दादा आहेत. ते कुठूनतरी परत येतील, मी त्यांना घट्ट मिठी मारेन, असंच मला वाटत होतं. पण तिथे सापडलेला त्यांचा तो अर्धवट जळलेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि ते घड्याळ पाहून सत्याचा स्वीकार करावा लागला,” असे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, २७ जानेवारीला संध्याकाळी अजित पवार गाडीने पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र, दोन कारणांमुळे त्यांचा प्रवास रद्द झाला. पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना भेटायला येणार होता, त्यांना उशीर झाला. तसेच एका फाईलसाठी अजित पवारांना थांबावे लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोजच्या वेळापत्रकानुसार अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले की, ४-५ तास मी माझी कामे करणार आहे. काही कार्यकर्ते, कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. एक फार मोठे नेते त्यांना भेटण्यासाठी येणार होते, त्यांना उशीर झाला आणि अजित पवार सायंकाळी ५ वाजता निघू शकले नाहीत. पूर्व विदर्भातील हे नेते आहेत. सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे मग ती फाईल कुठे आहे हे पाहिले गेले तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती मंत्रालयाच्या कार्यालयात होती. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. ती फाईल येईपर्यंत वेळ गेला. एक मोठा नेता आपल्या पक्षातील बोलत असेल तर सही करावीच लागेल. त्या फाईलसाठी अजित पवारांचा वेळ गेला. तेथील लोक आमच्याही जिवाभावाचे होते. त्यांनी जे सांगितले आहे, ते असे की कुठल्यातरी राजकीय कन्सल्टंट आहे त्यांचा जो काँट्रॅक्ट आहे त्याचा काहीच फायदा होत नाही, ते रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. यामध्ये वेळ गेला आणि अजित पवारांना बारामतीला गाडीने जायचा प्लॅन रद्द करावा लागला, असा दावा रोहित पवार यांनी केला.
‘मोसाद’ आणि घातपाताचा संशय
इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या पुस्तकाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्याचा चालक किंवा पायलट मारणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे, आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
अपघाताची टाईमलाईन (रोहित पवारांच्या दाव्यानुसार):
सकाळी ७.५६: विमान रडारच्या संपर्कात आले.
सकाळी ८.१०: विमानाचे उड्डाण झाले.
सकाळी ८.३२: विमान सुपे गावाजवळ पोहोचले.
८.४३ ते ८.४५: विमानाचा अपघात झाला.
सकाळी ९ वाजता अपघाताची माहिती मिळाली.
सकाळी ९.४५: निधनाची पहिली अधिकृत माहिती समोर आली.
पायलटवर दबाव आणि सुरक्षेची ऐशीतैशी:
विश्रांतीचा अभाव: पायलटसाठी आवश्यक असलेला १२ तासांचा ‘गॅप’ पाळला जात नाही.
धमकावून उड्डाण: इन्सेंटीव्ह कापण्याची किंवा नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन वैमानिकांना विमानावर बसविले जाते.
तांत्रिक हेराफेरी: उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करणे आणि विमानातील संभाषणाची रेकॉर्ड करणारी सीव्हीआर (CVR) यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली जाते.
मेन्टेनन्समध्ये कपात: कॉस्ट कटिंगच्या नावाखाली विमानाची योग्य देखभाल (Maintenance) केली जात नव्हती.




