पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित विकास कामांसाठी अजितदादा ‘ॲक्शनमोड’मध्ये!
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक
![Ajit Dada in 'action mode' for pending development works in Pimpri-Chinchwad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/ajit-pawar-4-780x470.jpg)
पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे स्विकारताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याची आग्रही भूमिका घेत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये पाणी, ड्रेनेज, ट्रॅफिकच्या समस्येसह शहरातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेत सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी सूत्रे स्विकारली. यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी (दि. 14) विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विकास कुमार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसह आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या आढावा बैठकीदरम्यान अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख प्रकल्पांची स्थिती, प्रलंबित विकासकामे, पाणीटंचाई, ड्रेनेज समस्या, वाहतूकीच्या समस्या, स्वच्छता यासह विविध विषयांची सखोल माहिती घेऊन चर्चा केली. व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.
दरम्यान, उपस्थितांना बोलताना अजितदादा म्हणाले, पिंपरी-चिंचवडची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत. चुकीच्या कामांना मी कधीच थारा दिलेला नसून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवितानाच शहराच्या भविष्याचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्याचेही आदेश यावेळी अजितदादांनी दिले.
पालकमंत्रीपदाची सूत्रे स्विकारताच 24 तासांच्या आतच दादा ॲक्शन मोडमध्ये आल्याने तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.