Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड। किवळे-मुकाई चौकशेजारी मद्यपींचा अड्डा; फूटपाथवरच ‘बैठक’!
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : तात्काळ कारवाई करा; सोसायटीधारकांची मागणी

पिंपरी । किवळे-मुकाई चौकशेजारी मद्यपींचा अड्डा तयार झाला असून, सायंकाळी या ठिकाणी मद्यपी ठिय्या मांडून बसलेले दिसतात. प्रचंड रहदारी असलेल्या या चौकात नियमितपणे पोलीस कर्मचारी असतात, मात्र याकडे कानाडोळा होत आहे. त्यामुळे सोसयटीधारक नागरिक, पदाचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

किवळे येथे कोहिनूर गार्डीअर सोसायटीसमाेरच ‘‘बैठक’’ रोज सायंकाळी पहायला मिळते. या भागात वाईन्स शॉप, स्नॅक सेंटर्स मोठ्या प्रमाणात आहेत. कोहिनूर सोसायटीसमोर फूटपाथवर नागरिकाची ये-जा असते. मात्र, पार्किंच्या बाजुला असलेल्या कठड्यावर मद्यपी खुलेआम मद्यप्राशन करीत बसतात. अनेकदा त्यांच्यामध्ये वादाचा प्रसंगही घडला आहे. रात्री उशीरापर्यंत मद्यपान करणाऱ्या मद्यपींच्या गोंधळामुळे या सोसायटीतील नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड सोसयटी फेडरेशनचे दत्तात्रय देशमुख म्हणाले की, किवळे मुकाई चौकाशेजारील कोहिनूर सोसायटीसमोर मद्यपान करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने अटकाव करावा. स्मार्ट सिटी म्हणून शहराची ओळख होत आहे. मात्र, हे चित्र शहराच्या प्रतिमेला गालबोट लावण्यासारखे आहे.






