अजितदादांनी केली संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का
महाराष्ट्र : संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. मराठवाड्यातील अनेक भागात मोर्चे, आंदोलन सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे.





