लाडकी बहिण योजनेतील महिलांना २१०० रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या..

मुंबई | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने घोषणा केली होती की जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर हा निधी २१०० रुपये केला जाईल. मात्र, अद्याप तो निधी वाढवला नसल्यानं चर्चा सुरू झाली असून त्यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत निवेदन केलं आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या, की लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की १५०० हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही.
नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून १००० रुपये तर वरचे ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं नाही. २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा : राजगुरूनगरमध्ये ‘हिट अँड रन’, बेधुंद कार चालकाची तीन दुचाकींना धडक
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत तीन प्रश्न उपस्थित केले. या योजनेसंदर्भात माझे तीन प्रश्न आहेत. पहिला, निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? दुसरा, निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केलं गेलं? आणि तिसरा, सरकारनं सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असं प्रश्न त्यांनी विचारले.
यावर आदिती तटकरे म्हणाल्या, की ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे.
महायुती सरकारनं ही योजना आणली आहे. महिलांना १५०० रुपयांचा लाभ देणारं महायुतीचं एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या.