खुलताबादच्या नामांतरावरून राजकीय वाद पेटला; अबू आझमींची सरकारवर टीका

Abu Azmi | गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केल्याने या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खुलताबाद शहराच्या नामांतराची चर्चा पुढे आली असून, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव ‘रत्नपूर’ असे बदलले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, या विधानावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अबू आझमी म्हणाले, “जर शहरांची नावं बदलून देशातील कायदा-सुव्यवस्था, महागाई आणि बेरोजगारी कमी होणार असेल, तर फक्त एका शहराचं नाही, तर संपूर्ण देशाचं नाव बदला. आम्ही त्याचं स्वागत करू.” त्यांनी पुढे सरकारवर टीका करताना म्हटलं, “जुन्या शहरांची नावं बदलून काय साध्य होणार? सरकारने नवीन शहर वसवावं, मग काही होईल. सध्या नावं बदलण्यामागचा हेतू हाच आहे की, लोकांचं लक्ष देशातील खऱ्या समस्यांपासून भरकटवायचं. एकीकडे महागाई वाढत आहे, चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करत आहे, सरकारकडे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठीही निधी नाही. पण या सगळ्यापासून लक्ष हटवण्यासाठी नामांतराचा मुद्दा पुढे आणला जात आहे. हे सर्व चुकीचं आहे.”
हेही वाचा : एमएमआर क्षेत्र आणि पुण्याच्या विकासाला मोठा बुस्टर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आझमी यांनी सरकारला विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना म्हटलं, “देशात विकासाची कामं झाली पाहिजेत. खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे. नुसत्या नावं बदलण्याने काहीही साध्य होणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने खुलताबादच्या नामांतरावरून सुरू असलेला वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, येत्या काळात यावरून आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.