सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा; भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा
![A thinker of common people; Manifesto of Bharatiya Janata Party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/BJP-Manifesto-For-Maharashtra-Election-2024-780x470.jpg)
BJP Manifesto 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आपला निवडणूक जाहीरनामा सादर केला आहे. तळागाळातल्या माणसाचा विचार करणारा आणि त्याच्या प्रगतीची काळजी घेणारा असा हा जाहीरनामा आहे. गोरगरिबांच्या कल्याणाची अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण यैजनेच्या अंतर्गत दिली जाणारी पंधराशे रुपये रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजे जवळपास 25 हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात दरवर्षी जमा होणार आहेत. तसेच किसान सन्मान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवाला सध्याच्या प्रतिवर्षी 12 हजार रुपये ऐवजी पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रत्येक गरिबाचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे म्हणजेच ही रक्कम दरवर्षी सुमारे 25000 होणार आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा वादा भाजपाने केला आहे.
महाराष्ट्रात तब्बल दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये देण्याचे वचन देखील भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार असल्याचे भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा आणखी सक्षम होणार आहे.
आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी
ग्रामीण भागात तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये मिळतील असे आश्वासन भाजपच्या जाहीरनामात देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांचे बिल शून्य रुपये महायुतीने या आधीच केले आहे. भविष्यात वीजबिलात 30 टक्के कपात होणार असून सौर उर्जेवर भर देण्याचा भाजपाचा मानस आहे. आगामी विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शंभर दिवसात “व्हिजन महाराष्ट्र 2029” सादर करण्याचे भाजपने म्हटले आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन देखील भाजपचा हा जाहीरनामा देतो.
भविष्यातला जमाना तंत्रज्ञानाच्या आधारावर अवलंबून असणार आहे. “मेक इन महाराष्ट्र”च्या अंतर्गत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून नागपूर, पुणे, नाशिक आणि अशी शहरे एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न देखील भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे.मेक इन महाराष्ट्राच्या अंतर्गत नागपूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी एरोस्पेस हब बनवण्याचा भाजपचा इरादा आहे.
सोयाबीनला 6 हजार रुपये हमीभाव
शेतीसाठी आवश्यक खतांवरील राज्य आणि वस्तू सेवा कर सवलत देण्याचे आणि सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच पुढील तीन वर्षात ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी 500 बचत गटांकरिता 1000 कोटींचा फिरता निधी भाजप उपलब्ध करून देणार आहे. अक्षय अन्न योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्याबरोबरच महारथी आणि अटल टिंकरीग लॅब योजनेच्या माध्यमातून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
दहा लाख उद्योजक घडविणार
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना, उद्योगांच्या गरजेच्या अनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक घडविण्याचे आश्वासन देखील हा जाहीरनामा देतो.
मागास वर्गीयांना प्रतिवृती सवलत
ओबीसी, एस ई बी सी,ई सी तसेच इ डब्ल्यू एस आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्कातून संपूर्णपणे प्रतिवृती सवलत देण्याचे आश्वासन देखील भाजपाने दिले आहे.
युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी, महाराष्ट्रातील गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्य रुग्णसेवा देण्याचे आश्वासन हा जाहीरनामा देतो.
धर्मांतराला आळा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सक्तीच्या धर्मांतरा विरोधात कायदा करण्याचे आणि फसव्या धर्मांतराला आळा घालण्याचे आश्वासन देखील भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळणार असल्याचे आणि वन्य प्राण्यांपासून होणारी जीवित हानी रोखण्याचे आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. एकूणच महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, दीनदलित अशा प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.