“…तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल”; पंतप्रधानांच्या वर्क फ्रॉम होम, इंधन संकटावरील आवाहनानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील सिकंदराबाद येथे नागरिकांशी संवाद साधताना देशवासीयांना मोठं आवाहन केलं आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जगभरावर होत आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता देशवासीयांना काही बंधने घालून पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे.
ही बाब लक्षात घेता, पीएम मोदी यांनी सर्व भारतीयांना वर्षभर सोनं-चांदी खरेदी करू नका आणि पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा, असे देखील त्यांनी आवाहन केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोदींचे आवाहन योग्य असल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“जगभरात अमेरिका,इस्रायरण-इराण युद्धामुळे तेल आणि गॅसच्या इंधन पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्मा झाला आहे. आपल्या बाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात किल्लत आहे. पाकिस्तानमध्ये 450 रुपये प्रति लिटर तेलाचे भाव झाले आहेत. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण, ही अडचण जर आपण समजली नाही आणि याचा उपयोग योग्य प्रमाणात नाही केला, तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते योग्य आहे. त्यांनी जे आवाहन केलं, त्यावर सर्व देशवासीयांनी अंमलबजावणी करावी, असे फडणवीसांनी म्हटले.
हेही वाचा – सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट, महाराष्ट्रातील या भागासह अनेक राज्यांना अलर्ट जारी
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे. तसेच गॅस, पेट्रोल, डीझेल यांसारखी आयात होणारी पेट्रोलियम उत्पादने गरजेनुसारच वापरली जायला हवीत. त्यामुळे परकी चलनाची बचत तर होईलच. त्याशिवाय, युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी होईल,” असा विश्वास मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, “पश्चिम आशियातील संघर्षामुळे संपूर्ण जगासमोर विविध समस्या निर्माण झाल्या. गॅसटंचाईच्या स्वरूपात भारतातही धग जाणवली. त्याबाबींचा आधार घेऊन मोदी म्हणाले, केंद्र सरकारने सर्वप्रथम १०० टक्के एलपीजी कव्हरेजवर भर दिला. आता आपला फोकस पाईप्ड गॅस पुरवठ्यावर आहे.
सीएनजी आधारित व्यवस्थेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्या सर्व प्रयत्नांमुळे भारत जगासमोरील मोठ्या ऊर्जाविषयक पेचाची योग्य प्रकारे हाताळणी करत आहे. सौर ऊर्जेविषयी भारताने जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भातही देशाने अभूतपूर्व कार्य केले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी केलेली 9 आवाहने –
-पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा
-परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा
-खाद्यतेलाचा वापर मर्यादित करा
-पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका
-वर्षभर परदेशी प्रवास टाळा
-मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा
– वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठकांवर वर भर द्या
-कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे
-परकीय चलन वाचवण्यावर भर द्या.





