लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी १९९ कोटींचा खर्च! विरोधकांचा आक्षेप

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात जनजागृतीसाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्नदेखील केले जात आहेत. मात्र, या योजनेसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या केवळ प्रसिद्धीसाठी जवळपास २०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा मुद्दा आता चर्चेत आला असून विरोधकांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या शासन आदेशामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ प्रसिद्धीसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपये मंजूर करण्यात आल्याचं नमूद केलं आहे. तसेच, या निधीचा वापर योजनेच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमांवर कसा करावा, याबाबतचा तपशीलही देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेसोबत समन्वय साधून माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी आराखड्यावर काम करावं, असं या आदेशात म्हटलं आहे.
प्रचार व प्रसिद्धीसाठी मिडिया प्लॅनिंग करणे, व्हिडीओ व ऑडिओ जाहिरातींचे क्रिएटिव्ह, इतर माध्यमांवरील प्रसिद्धीचा मजकूर यासंदर्भातली कार्यवाही नियमानुसार करावी. ही प्रसिद्धी विहीत नियमांनुसार होईल याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. या जाहिरातींचं नियंत्रण व पर्यवेक्षण महिला व बाल विकास विभागानं करावं, असं शासकीय आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा – ‘मविआतून कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, माझा पिठींबा असेल’; उद्धव ठाकरेंचं विधान चर्चेत
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल!
जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशीसुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत सहभागी पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी हे सरकार किती तत्पर आहे, असेच म्हणावे लागेल. ह्या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत. पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातींसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे. येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.




