‘मविआतून कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, माझा पिठींबा असेल’; उद्धव ठाकरेंचं विधान चर्चेत

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंदन सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला आहे. यावेळी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोग आज काहीतरी घोषणा करणार आहे. माझं मत आहे की आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकच जाहीर करून टाकावी. आमची तयारी आहे. तयारी आहे हे बोलायला सोप्प वाटतं. मात्र, ही लढाई पाहिजे तेवढी सोपी नाही. लोकसभा निवडणुकीत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजलं. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या संरक्षणाची लढाई होती. आता ही लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ही लढाई कशी असावी एक तर तू राहशील किंवा मी राहील. तू राहशील किंवा मी राहील ही लढाई आपल्या मित्र पक्षात नको, म्हणजे महाविकास आघाडीत नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांना आपण मिळून एकतर तू राहशील किंवा मी राहील हे सांगू.
हेही वाचा – वेदांताचार्य विठ्ठल महाराज धोंडे यांचा लोकरत्न पुरस्कारने सन्मान; वारकरी सांप्रदायातील योगदानामुळे गौरव
महायुती सरकारला आता जाग आली आहे. आता ते पाण्यात डुबक्या मारून पवित्र होता येईल का? पाहत आहेत. मग ते सगळीकडे स्वत:चे फोटो छापत आहेत. मात्र, आपण ही निवडणूक अशी लढायची हे आपण ठरवायचं आहे. पण आपल्यामध्ये काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा आहेत की आणखी कोण आहे? मी आता या ठिकाणी सांगतो, येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





