राज्यभर पावसाने थैमान घातले असल्याने दहावीची पुरवणी परीक्षा ढकलली पुढे!
![10th supplementary examination has been postponed due to heavy rains across the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/10th-supplementary-exam-student-780x470.jpg)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळणार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दहावीचा शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. आता हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. दरम्यान, दहावीबरोबर बारावीचा पेपर देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे.
हेही वाचा – संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक; म्हणाले..
यात दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होत आहे. परंतु सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटीदेखील जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्र पेपर-एक, इतिहास व राज्य शास्त्र हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.