breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय परिस्थिती बदलली: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय बदलांच्या हालचाली!

‘ते’ दोन बडे अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला? : शिंदे-फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर टांगती तलवार!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात प्रमुख पदावर काम केलेले दोन बडे अधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला मुंबईत गेले आहेत. त्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय बदलांची शक्यता आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ताकाळात महापालिकेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काहीजणांनी फिल्डिंग लावली आहे.

भाजपाच्या सत्ताकाळात महापालिका आयुक्तपदी श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी भाजपाला अनुकूल भूमिका घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजेश पाटील यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. पाटील यांनी भाजपाच्या विकासकामांना ‘खो’ घातल्याची टीका झाली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा तत्कालीन आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्याठिकाणी विद्यमान आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील गेल्या दोन दिवसांत प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अजित पवार गट भाजपा-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाला. राजकीय वाटाघाटीनुसार, पुणे जिल्ह्यात महायुतीकडून दोन मंत्रीपदे देण्यात आली. अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मंत्रीपद मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार आता अजित पवार यांच्या मर्जीनुसार होईल, असे चित्र आहे.

दरम्यान, प्रशासकीय वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने महापालिकेतील प्रशासकीय बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये काम करण्यास इच्छुक असलेले दोन बडे अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुन्हा ‘फिल्डिंग’ लावून आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संबंधितांनी मुंबईत भेट घेतली असून, नव्या जबबादारीसाठी शुभेच्छा व्यक्त दिल्या आहेत. या माध्यमातून ‘त्या’ दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘‘शिंदे-फडणवीस-पवार’’ सरकारच्या माध्यमातून ‘साखरपेरणी’ केली असून, महापालिकेतील एक किंवा दोन अधिकाऱ्यांवर बदलीची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button