युट्युबवर शॉर्टफिल्म बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग करत तिच्या होणा-या पतीला मारहाण
![Mocca should be effective to avoid the repetition of "TADA"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crime-registered-patangbaj_202101544305-e1625639033763-1-2.jpg)
पिंपरी चिंचवड | युट्यूबवर शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या महिलेचा विनयभंग करून एकाने महिलेच्या होणा-या पतीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २२) दुपारी सव्वातीनच्या सुमारास कावेरीनगर पुलाजवळ, 16 नंबर बसथांब्याशेजारी थेरगाव येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश सावंत (वय 40, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला यूट्यूब चॅनलवर शॉर्ट फिल्म बनविते. थेरगाव येथे कावेरी नगर पुलाजवळ सेवा रस्त्यावर वाहनांचा खोळंबा झाला होता. त्यावेळी पीडित महिला व तिचा होणारा पती तेथून जात होते. त्याच वेळी आरोपी देखील त्याच्या चारचाकी वाहनातून तेथे आला. गाडी काढा, असे आरोपी हात करून म्हणाला. फिर्यादी महिलेने ‘थांबा’, असा हाताने इशारा केला.
या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या होणा-या पतीला गाडीवरून ओढून खाली पाडले. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला मारहाण केली व गैरवर्तन करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. बघून घेतो, अशी फिर्यादीच्या होणा-या पतीला आरोपीने धमकी दिली. वाकड पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.