ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पुण्यात, राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार सत्कार
पुणे – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुण्यात दाखल झाला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (सोमवारी) दक्षिण कमांड येथे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार होणार आहे.
टोकीयो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या सैन्यसेवेतील कर्मचाऱ्यांचा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे येथे आज सत्कार केला जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. या समारंभाला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला नीरज चोप्रा देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, नीरज चोप्रा पुण्यात पोचला असून, पुणे विमानतळावरील त्याचे फोटो समोर आले आहेत.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत. तसेच, इतर सैन्यसेवेतील कर्मचारी या समारंभात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री एएसआय आणि जवानांच्या नवोदित खेळाडू संघांसोबत संवाद साधणार आहेत.





