पवना धरणातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला

पिंपरी : मावळातील पवना धरणात पाणीसाठी 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला असून सध्यःस्थितीत धरणात 48.57 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवना धरणावर पिंपरी-चिंचवड शहर, लहान मोठे उद्योग व्यवसाय, मावळ तालुक्यातील अनेक खेडी व तेथील शेती अवलंबून आहे. पवना धरणात 49.30 टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतु गतवर्षी 21 मार्चअखेर धरणात 48.75 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा धरणात गतवर्षीपेक्षा अर्धा टक्का पाणीसाठा अधिक आहे.
असे असले तरीही यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असून पाणी घटण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे. धरण विभागाने पाणी जूनअखेर पुरेल असे नियोजन केले असले तरीही नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून गरजेनुसार पाणी वापरणे गरजेचे आहे.
याशिवाय मावळ तालुक्यातील आंद्रा जलाशयात 51.15 टक्के, वविळे जलाशयात 64.26 टक्के, मुळशी तालुक्यातील कासारसाई जलाशयात 44.27 टक्के तर भामा आसखेड जलाशयात 52.75 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.