शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु
![vaccination-of-15-to-18-year-old-children-started-in-the-city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220103-WA0001-e1641193450107.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 या वयोगटांतील मुले व मुलींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आज (सोमवार) पासून सुरु झाले आहे. या वयोगटातील 1 लाख 16 हजार 700 मुले-मुली शहरात आहेत. या पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले आहे.महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात चैतन्य हाडे (वय 17) या मुलाला लस देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. भोईर, नगरसेवक सचिन चिखले, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, नगरसेविका कमल घोलप, श्रीनिवास बिराजदार आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार 15 ते 18 या वयोगटासाठी महापालिकेने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. जन्माचे वर्ष 2007 व त्या पूर्वीचे असलेले सर्व मुले व मुली डोस घेऊ शकतात. या वयोगटातील मुलांची शनिवार (दि. 1) पासून कोविड पोर्टलवर नोंदणी केली जात आहे.लाभार्थी स्वतः नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीसाठी कोविड पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने किंवा युनिक मोबाईल क्रमांकाद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभार्थ्यासाठी उपलब्ध आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑन साईट पध्दतीने लसीकरण कर्मचाऱ्यांकडेही नोंदणी करू शकतात.
या केंद्रावर सुरु आहे लसीकरण
आकुर्डी रुग्णालय, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, तालेरा रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, वायसीएम रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, मासुळकर कॉलनी, अजमेरा, थेरगाव रुग्णालय, नवीन थेरगांव रुग्णालय, भोसरी रुग्णालय, जुने भोसरी रुग्णालय (पुना पब्लिक स्कुल), यमुनानगर रुग्णालय, काळभोर गोठा उर्दू शाळा, यमुनानगर रुग्णालया शेजारी, यमुनानगर, जिजामाता रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय, सांगवी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना.