देहूगाव, तळेगाव येथे दोन महिलांचे दागिने हिसकावले : एक लाख 32 हजारांचे दागिने पळवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/CHAIN-SNACHING_01.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या दोन घटना देहूगाव आणि तळेगाव दाभाडे येथे घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये एक लाख 32 हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दोन्ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री घडल्या.
देहूरोड पोलीस ठाण्यात महिलेने बुधवारी (दि. 13) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास देहूगाव येथे पायी चालत जात होत्या. त्या युनीकेअर हॉस्पिटलजवळ आल्या असता त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 72 हजारांचे दोन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातही महिलेने फिर्याद दिली असून दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी रात्री त्यांची सासू आणि मुलगा यांच्यासोबत तळेगाव स्टेशन कडून शिवाजी चौकाकडे पायी चालत जात होत्या. रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 हजारांचे 19.72 ग्राम वजनाचे मिनी गंठण हिसकावून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.