मतदार नोंदणीसाठी आजची शेवटची संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/mahaenews-11-780x470.jpg)
पिंपरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी आजचा (शनिवार, दि. १९) एकच दिवस शिल्लक राहिला आहे.अर्ज क्रमांक ६ भरुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर असून त्यापूर्वी १० दिवसांपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते.त्यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नावाची खात्री करावी.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम समाजाचे आंदोलन स्थगित
मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्रमांक ६ भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे १९ ऑक्टोबरपूर्वी सादर करावा, असेही डॉ. दिवसे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार आज शनिवारचा (दि. १९) एकच दिवस शिल्लक राहिला आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी त्वरीत मतदान यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश करुन घ्यावा. याकडे दुर्लक्ष करणा-या व्यक्तींवर विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क गमावण्याची वेळ येणार आहे.