संगीतसाधना आणि तपश्चर्येचा अद्भुत प्रवास थांबला : महापौर उषा ढोरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/lata-mangeshkar.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने सप्तसुरांच्या स्वरसम्राज्ञी हरपल्या असून संगीतसाधना आणि तपश्चर्येचा अद्भुत प्रवास थांबला, अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विनयशील व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न लतादिदी यांचा स्वर म्हणजे भावना आणि संवेदनांचा अनोखा अविष्कार आहे. त्यांचं गाणं केवळ सप्तसुरांपर्यंत मर्यादित नव्हतं, तर एक तरल अलौकिक अनुभुती देणारं, जगणं समृद्ध करणारं असं स्वरामृत आहे. हे स्वरामृत प्राशन करून इथलं प्रत्येक मन संगीतमय झालं आहे.
त्यांचे जाणे हे संपूर्ण भारतवर्षासह कला जगतासाठी वेदनादायी आहे. लतादीदी या संगीत क्षेत्रातील चालतं बोलतं विद्यापीठ होत्या. संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून कित्येक पिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील. आम्ही समस्त पिंपरी चिंचवड शहरवासीय या राष्ट्रीय दुःखात सहभागी आहोत. लतादीदींना आम्हा पिंपरी चिंचवडकरांचा अखेरचा दंडवत.