“एक दिवा हुतात्म्यासाठी” उपक्रमाने ‘‘डी.एस.के कुंजबन’’मध्ये जागवला राष्ट्रप्रेमाचा जागर!
भारतीय सैन्यांप्रति कृतज्ञता : विधायक उपक्रमातून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न

पिंपरी- चिंचवड : दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुनावळे येथील डी.एस.के. कुंजबन सोसायटीतील ‘‘शौर्य स्थळ’’वर आयोजित करण्यात आलेल्या “एक दिवा हुतात्म्यासाठी” या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या वीर शहीदांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या कृतज्ञता कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, यशवंत इन्फिनिटी सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक तसेच कुंजबन सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, या उपक्रमाची कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, नियोजन यशवंत इन्फिनिटी सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे, तर आयोजन कुंजबन सोसायटीच्या सभासदांचे होते. या त्रिसंवादातून साकारलेला उपक्रम राष्ट्रप्रेमाचे प्रतिक ठरला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजसेवक श्री. राहुल काटे, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष ‘‘कारगिल समर सेनानी’’ रामदास मदने, भारतीय थल सेना निवृत्त अधिकारी बाळकृष्ण सुर्वे, भारतीय वायु सेना निवृत्त अधिकारी रत्नाकर करंकाळ, एससीजी कमांडो माजी अधिकारी चंद्रकांत कडलग, यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते. श्री. पवार आणि श्री. किशोर यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर आणि भक्तिगीतांनी वातावरण भारावून टाकले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे मावळ-मुळशी तालुकाध्यक्ष श्री. रामदास मदने, श्री. रत्नाकर करंकाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. देशपांडे, श्री. सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – ‘मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्याप्रमाणात आयोजन करणार’; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या जोशी यांनी संयमीत पद्धतीने पार पडले, तर कुंजबन सोसायटीचे चेअरमन अधिकराव दिवे-पाटील यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश पाचपुते, हित गुप्ता, संजय थोरात यांनी परिश्रम घेतले.
हुतात्यांच्या स्मृती जागवल्या…
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश वंदना यांनी झाली. त्यानंतर हुतात्मा स्मारकास माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केले. उपस्थित महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनीही स्मारकास पुष्प अर्पण करत आपली श्रद्धांजली वाहिली. उपस्थित सर्वांनी मिळून एक दिवा प्रज्वलित केला आणि हुतात्म्यांच्या परिवाराच्या जीवनात प्रकाश नांदावा अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. हुतात्म्यांच्या स्मृती जपणारा, राष्ट्रप्रेम जागवणारा आणि समाजाला एकत्र आणणारा हा उपक्रम दीपावलीसारख्या सणासुदीच्या काळात एक वेगळीच उजळण ठरली.




