चांगल्या संस्कारातूनच नवी पिढी घडेल
पुरुषोत्तम सदाफुले यांचा विश्वास, कवी प्रभाकर चव्हाण यांना ‘विनोबा भावे जीवनगौरव पुरस्कार’

पिंपरी : मुलांना अधिकाधिक चांगले संस्कार कसे देता येतील, हे पहायला हवे. त्यातूनच नवी पिढी घडेल, असा विश्वास महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी येथे व्यक्त केला.
‘राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थे’च्या वतीने चिखलीतील ‘टाऊन हॉल’ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कवी, योगशिक्षक व ‘शब्दब्रम्ह विविधांगी सेवा संस्थे’चे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांना ‘आचार्य विनोबा भावे जीवनगौरव पुरस्कार’, योगिराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांना ‘यशवंतराव चव्हाण सहकारभूषण पुरस्कार’, तर वैशाली सावळेकर यांना ‘आदर्श पालक पुरस्कार’ सदाफुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नगरसेवक यश साने, विकास साने, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सोनम मोरे, संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश वाघमोडे, गजानन वाघमोडे, मोहन देवकाते, शंकर जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा – दहावी-बारावी परीक्षांसाठी कडक कॉपीमुक्त अभियान; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा विशेष बंदोबस्त
या वेळी बोलताना सदाफुले म्हणाले, की मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. आजची स्थिती पाहता शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. मुलांना मुक्तपणे खेळू द्या. बागडू द्या. त्यांच्या कलागुणांना वाव द्या. यश साने म्हणाले, की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे. मोबाईलचे किती दुष्परिणाम आहेत, हे आपण एक सर्व जण पाहत आहोत. त्यामुळे याबाबत पालकांनी काळजी घेतली पाहिजे.
विकास साने म्हणाले, आज संस्कार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच पालकांनी योग्य वयात मुलांवर योग्य ते संस्कार करण्यावर भर दिला पाहिजे. त्यातूनच मुले घडतील.
प्रभाकर चव्हाण म्हणाले, ‘हा घरचा पुरस्कार आहे. वाढती स्पर्धा, नोकरीधंदा, ताणतणाव यामुळे बऱ्याचदा पालकांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. मात्र, मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. योग्य संस्कारच मुलांना चांगला नागरिक बनवू शकतात.
रंजना आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. सई पांचाळ यांनी परिचय करून दिला. तर सत्यवान वाघमोडे यांनी आभार मानले




