पिंपळे सौदागरमध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात भाजपचा ‘धडाका’
मिशन- PCMC : “आपकी बार १०० पार”चा नारा देत जोरदार प्रचार

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत “आपकी बार १०० पार”चा नारा देत भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभागात भाजपचा प्रभाव अधिकच वाढताना दिसत आहे. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये यंदा चारही जागांवर कमळ फुलणार, असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपा–आरपीआय (आठवले गट) चे अधिकृत उमेदवार शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, संदेश काटे, अनिता संदीप काटे आणि कुंदाताई संजय भिसे हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात असून, संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या माध्यमातून विकासकामांचा लेखाजोखा मांडत उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
हेही वाचा : आरोग्य, स्वच्छता आणि संकटावर मात करणारा नेता : तुषार कामठे
भाजपच्या चारही उमेदवारांनी यंदा चारही जागा जिंकण्याचा संकल्प केला असून, प्रभाग क्रमांक २८ मधील रहाटणी व पिंपळे सौदागर परिसर अक्षरशः पिंजून काढण्यात येत आहे. सकाळपासूनच विविध सोसायट्यांमध्ये गाठीभेटी, संवाद व प्रचार फेऱ्यांवर भर देण्यात येत आहे. शनिवार–रविवार सुट्टीचे दिवस असल्याने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत आहे.
यावेळी अनेक सोसायटीधारकांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारमुळे पिंपळे सौदागर परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याचे सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा लक्षात घेता विकासात्मक आणि भयमुक्त पिंपळे सौदागर–रहाटणीसाठी आम्ही भाजपसोबत आहोत, असा ठाम विश्वास मतदारांनी उमेदवारांना दिला आहे.
पिंपळे सौदागर–रहाटणीच्या प्रत्येक रहिवाशासाठी विकास, सुरक्षा आणि सुव्यवस्था हाच आमचा ध्यास आहे. आपण दिलेल्या विश्वासावर आम्ही खरे उतरू आणि प्रभाग क्रमांक २८ चे चारही उमेदवार बहुमताने निवडून आणू.
– शत्रुघ्न काटे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 28.




