सप्तर्षी फाउंडेशनतर्फे दिव्यांग बालकांसाठी १८वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर संपन्न

पिंपरी | दिव्यांगत्व म्हणजे अपंगत्व नव्हे, तर वेगळ्या क्षमतेची ओळख—या भावनेतून सप्तर्षी फाउंडेशन, निर्वाण दिव्यांग संस्था व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी १८वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. हे शिबिर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले होते.
हे शिबिर १८ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी येथील दिव्यांग भवन, मोरेवाडी येथे झाले. शिबिराचा एकूण १५७ दिव्यांग बालक व लाभार्थ्यांनी लाभ घेतला. वैद्यकीय उपचारांसोबतच पालक समुपदेशन, आजारांविषयी सविस्तर माहिती, दीर्घकालीन उपचार मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यावर विशेष भर देण्यात आला.

या उपक्रमाची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून करण्यात आली असून, आजपर्यंत शेकडो दिव्यांग बालक व त्यांच्या कुटुंबांना याचा मोठा आधार मिळाला आहे. नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत व नियमित होमिओपॅथी उपचार देऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी २००५ साली महाबळेश्वर येथे विशेष मुलांसाठी चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे संचालक डॉ. अंबरीश विजयकर व तरंग विजयकर हे कार्य अविरतपणे पुढे नेत आहेत. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पुणे शाखा प्रमुख डॉ. रजत मालोकार यांनी विशेष पुढाकार घेतला.

हेही वाचा : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय
शिबिराचे उद्घाटन डॉ. रजत मालोकार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. परेश गांधी (मुख्य कार्यकारी अधिकारी, दिव्यांग भवन फाउंडेशन), श्री. दर्शन मुंदाडा (सह-संस्थापक, टीबीएल कन्सल्टन्सी सर्विसेस), सौ. शिवानी पंडित (संस्थापिका, सामर्थ्य फाउंडेशन), श्री. सौरभ शिंदे (सामर्थ्य फाउंडेशन) व अदिती जाधव (ए.आय.सी. पिनॅकल) उपस्थित होते. मान्यवरांनी सप्तर्षी फाउंडेशनच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग बालकांचे समुपदेशन व उपचार केले. तसेच “दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन” या अभिनव प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प भारत सरकारच्या कॉपीराइट विभागाकडून मान्यताप्राप्त असून, आरोग्य, शिक्षण, रोजगार व मार्गदर्शन एका छताखाली देण्याचा यामागील उद्देश असल्याचे मनोजकुमार बोरसे यांनी सांगितले.
सप्तर्षी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्यरत असून, बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार, हिवाळ्यात गरजूंना चादर वाटप तसेच दिव्यांग बालक व त्यांच्या पालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले.




