ठाकरे सेना ‘घायाळ’ : पिंपरी-चिंचवडमधील प्रभावाला सुरुंग
![Thackeray Sena 'Wounded': Tunnel of influence in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Shivsena-Pcmc-780x470.jpeg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (ठाकरे गट) चे अस्तित्व आता नाममात्र उरले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत सेनेतील मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मध्ये सामील झाला. त्यानंतर कामगार नेते इरफान सय्यद यांनीही ‘शिंदेशाहीत’ सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एकाही नगरसेवकाने अद्याप आपली राजकीय भूमिका निश्चित केलेली नाही. अगोदरच सेनेत बारणे, कलाटे आणि निष्ठावंत शिवसेना अशी स्थानिक गटबाजी होती. त्यात आता शिंदे गट आणि ठाकरे गट अशी दरी निर्माण झाली आहे.
खासदार बारणे यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपाशी जवळीक केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी महायुती होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचा फायदा बारणे यांना लोकसभा निवडणुकीतसुद्धा होणार आहे. राजकीय सोय म्हणून किंवा हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करीत बारणे यांनी २०२४ ची पायाभरणी केली.
दुसरीकडे, कामगार नेते इरफान सय्यद यांचाही प्रभाव पिंपरी-चिंचवडमधील माथाडी कामगार क्षेत्रात आहे. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळावर यांचे निकटवर्ती असल्यामुळे सय्यद ठाकरे गटातून बाहेर पडणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला.
संजय राउत यांचे स्वप्न भंगले…
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेमध्ये उत्साह संचारला होता. त्यावेळी खासदार संजय राउत यांनी पिंपरी-चिंचवड दौऱ्यात मोठे विधान केले होते. ‘‘पिंपरी-चिंचवडचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल’’ असा दावा त्यांनी केला होता. मात्र, अल्पावधीत महाविकास आघाडी सरकार पडले आणि शिवसेनेला अहोटी लागली. आजच्या घडीला शहरातील ९ माजी नगरसेवकांपैकी किती ठाकरे गटासोबत राहतील की, शिंदेगटात सहभागी होतील, याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे राउत यांचे महापौर बसवण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची सूतराम शक्यता नाही.
सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या भूमिकेकडे लक्ष…
कामगार नेते इरफान सय्यद यांच्यानंतर आता भोसरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे आणि माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांची काय भूमिका असेल? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वास्तविक, उबाळे आणि आल्हाट यांचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. दोन्ही नेत्यांना महापालिका सभागृहात प्रवेश करण्यास पहिले प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गट म्हणजे बुडते जहाज… अशा भूमिकेतून उबाळे आणि आल्हाट दोघेही शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतील. कारण, महापालिकेत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी महायुती होणार असून, त्याचा फायदा निवडणुकीत विजयापर्यंत पोहोचण्यासाठी होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.