राहुल यांच्या पदयात्रेच्या वेळी शक्तिप्रदर्शनाची तयारी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेचे आता काही दिवसांतच महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राज्यात दोन आठवडय़ांच्या कालावधीत पदयात्रेचा ज्या ठिकाणी मुक्काम असेल, तेथे विविध सामाजिक गटांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. नांदेड व शेगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या दोन्ही सभांमधून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.
भाजपच्या हिंदूत्ववादी राजकारणाला आव्हान देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे. तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १७ दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यात आता थोडा बदल करण्यात आला असून राज्यात १४ दिवस पदयात्रा चालेल, असे सांगण्यात आले.





