सेक्टर १२ गृहप्रकल्पात भाडेकरू ठेवता येणार नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-66-780x470.jpg)
पिंपरी : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) भोसरी स्पाईन रोड रस्त्यावर सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला आहे. जवळपास साडेचार हजार घरांचा हा प्रकल्प आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले. दरम्यान, नुकतेच बांधण्यात आलेल्या सोसायटीचे वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आता सोसायटीची देखभाल स्वतंत्र राहणार आहे. याच धर्तीवर आता भाडेकरू ठेवण्याच्या विषयावर रहिवाशांमध्ये वादावादी होत आहे. यामध्ये प्राधिकरणाने थेट नोटीस काढून भाडेकरू ठेवता येणार नाही असे स्पष्ट केले.
सेक्टर १२ या ठिकाणी उभारल्या सोसायटींचे देखभाल आणि सर्व जबाबदारी ही प्राधिकरणाकडे होती. मात्र, आता वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित सोसायटीची जबाबदारी त्या त्या सोसायटीकडे राहणार असून, त्याबाबत पदाधिकारी नेमलेले आहेत. मात्र आता नव्याने झालेल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाडेकरू ठेवण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे भाडेकरू ठेवलेल्या सदनिका धारकांनी पीएमआरडीए धाव घेतली आहे. यापूर्वी पीएमआरडीएकडे जबाबदारी असल्याने कोणतीही अडचण निर्माण झाली नव्हती. मात्र, सोसायटीची नोंदणी झाल्याने त्यांची गोची झाली आहे. दरम्यान जवळपास २० ते २५ सदनिकाधारक या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांना भेटले. मात्र त्यात कोणतीहा तोडगा निघाला नाही. अधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवून त्यांना माघारी पाठवले.
हेही वाचा – पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले..
दरम्यान, सोसायटी निर्माण झाल्याने त्याबाबत प्राधिकरणाचा हस्तक्षेप कमी झाला आहे. सदनिकाधारकांनी भाडेकरू ठेवू नये, याबाबत आधीच सूचना दिली आहे. तसे पत्रक काढण्यात आले असून, प्रत्येक सोसायटीधारकांना त्याबाबत कळवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भाडेकरू ठेवण्याचे निदर्शनास आल्यास कारवाई देखील करण्यात येणार आहे.
सेक्टर १२ येथील येथील पहिल्या टप्प्यातील बांधकाम करणारे दोन बांधकाम व्यवसाय अडचणीत आले आहेत. पीएमआरडीए आयुक्तांनी सेक्टर १२ येथील रहिवाशांच्या समस्यांवर स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायांच्या चुका निदर्शनास आल्या. संबंधित बांधकाम व्यवसायिकांवर दंडाची नोटीस देखील दिली होती. त्यासंबंधीचा अहवाल आयुक्ताच्या टेबलावर ठेवण्यात आलेला आहे.
सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यातील रहिवाशांच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या तक्रारी अद्याप सुरू आहेत. पावसाळ्यामध्ये देखील काही ठिकाणी गळती होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर, खिडक्यांचा काचा खाली कोसळून अपघाताची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.