अमोल मिटकरीची लायकी काय? अमोल मिटकरी-अमेय खोपकरांमध्ये जुंपली

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पूरस्थितीच्या भागाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता. मिटकरींनी केलेली ही टीका मनसैनिकांच्या जिव्हारी लागली आणि अकोल्यातील मनसैनिकांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर मिटकरींनी मनसेच्या नेत्यांवर खोचक शब्दात टीका केली. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांना इशारा दिला आहे.
अमेय खोपकर म्हणाले, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मग हे अमोल मिटकरी कोण आहेत? त्यांची पात्रता काय आहे? अमोल मिटकरी घासलेट चोर आहेत. ते त्यांच्या गावात आधी घासलेट चोरायचे आणि विकायचे. मग राज ठाकरेंवर बोलायची त्यांची लायकी नाही. अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी टीका करणं वेगळं आहे.
हेही वाचा – मनोज जरांगेंचं मराठा समाजाल भावनिक आवाहन; म्हणाले, मी शेवटच्या घटका..
जर टीका करायची असेल तर टीका करा. मात्र, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं नाही. अन्यथा कानाखाली आवाजच निघेल. आता यापुढे मी सांगतो, जे कोणी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील लोक आहेत, त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली तर त्यांच्या कानाखाली आवाज निघणार. मग आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा. यापुढे आता अमोल मिटकरींनी त्यांचं थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.





