एम-पल्स कबड्डी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती आणि संघभावना वृद्धिंगत करण्याचा उपक्रम

आळंदी | एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (MIT ACSC), आळंदी येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी “एम-पल्स कबड्डी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा” दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडली.
ही स्पर्धा महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे, उपसंचालक सौ. मानसी अतितकर तसेच सर्व डीन व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे संचालन क्रीडा संचालक श्री. राजेश कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर क्रीडा सचिव श्री. केतन महंत (तृतीय वर्ष बीसीए सायन्स) यांच्या नेतृत्वाखाली आयोजन यशस्वी झाले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून श्री. दिनेश भालेराव (तृतीय वर्ष बी.एस्सी. आयटी) यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले.
या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एकूण १० महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यामध्ये एआयटी कॉलेज, दिघी; डॉ. डी. वाय. पाटील ए.सी. (नाईट) कॉलेज; रसिकलाल एम. धारीवाल फार्मसी कॉलेज; एच.आर.एम. ए.सी.एस. कॉलेज, राजगुरुनगर; डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस.सी. कॉलेज, पिंपरी; पिंपरी चिंचवड विद्यापीठ; डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आंबी; पी.के. आय.टी. कॉलेज; एमआयटी एसीएससी तसेच एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (MIT AOE) या संघांचा समावेश होता.

हेही वाचा : डी. वाय. पाटील एज्युकेशनल फेडरेशनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, संघभावना आणि क्रीडास्पृहा दाखवली. अंतिम सामन्यात डॉ. डी. वाय. पाटील ए.सी. (नाईट) कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले, तर डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस.सी. कॉलेज, पिंपरी संघाने उपविजेतेपद मिळविले.

बक्षीस वितरण समारंभात संचालक डॉ. बी. बी. वाफरे, उपसंचालक सौ. मानसी अतितकर, डीन व सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून, सहभागी सर्व संघ, स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
“कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. अशा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून महाविद्यालय अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत राहील.”
– डॉ. बी. बी. वाफरे, संचालक.




