“विठ्ठल विठ्ठल” नामघोषात विद्यार्थी झाले दंग!
शिक्षण विश्व: आषाढी एकादशी निमित्त संत साई शाळेत उत्सव साजरा

पिंपरी चिंचवड : भोसरी येथील संत साई हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, विठ्ठल रखुमाई पूजन व पालखी, ग्रंथ पूजनाने झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळा, फुगडी, भजन, अभंगगायन यांसारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. “माऊली माऊली” च्या गजरात शाळेचा परिसर भक्तिमय झाला.
ह. भ. प. मीराताई काटमोरे व सहकारी यांनी सादर केलेले भक्तीगीत व भारुडचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले..या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वारकरी परंपरा ही आपली संस्कृती, भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी या परंपरेतून भक्ती, शिस्त आणि समाजभावना शिकाव्यात.” या कार्यक्रमाला शाळेच्या उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, मनोज वाबळे, संजय अनार्थे, मंजुषा वाळवेकर, मालन लिगाडे, अक्षय राणे, स्वाती मोघे, रिया पोतदार, शुभांगी काटे, संगीता शिंदे यांचेही सहकार्य लाभले.
हेही वाचा – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी’; सरन्यायाधीश भूषण गवई
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी सायली गायकवाड व श्रीशा लोंढे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका श्वेता नारायणगावकर यांनी केले. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी पूर्वी जावळगी हिने वारीचे सुंदर असे वर्णन केले.
कार्यक्रमाला उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भगवान पठारे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनिता ढवळेश्वर, संस्थेच्या डायरेक्टर पायल ढवळेश्वर, भारती ढवळेश्वर,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.