स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर गोळीबार; प्रकृती गंभीर!
चाकण लगतच्या वराळे येथील घटना, महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : चाकण औद्योगिक परिसरात महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकराच्या सुमारास वराळे येथील कैलास स्टील कंपनीत घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी दहा पथके रवाना करण्यात आली आहेत.
अजय विक्रम सिंग (वय ३४, रा. हिंजवडी, मूळ – उत्तर प्रदेश) असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. कंपनीचे सुपरवायझर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय सिंग हे मागील काही वर्षांपासून चाकण येथे वास्तव्यास आहेत. ते वराळे येथील कैलास स्टील कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ते कंपनीच्या आवारात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून हेल्मेट घातलेले दोन हल्लेखोर कंपनीच्या आवारात आले. त्यांनी अजय सिंग यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळया झाडल्या आणि वराळे – भांबोली गावच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यामध्ये अजय सिंग यांच्या पोटात आणि कमरेत दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात व्यावसायिक, आर्थिक व्यवहार किंवा खंडणी अशा कोणत्याही कारणावरून हा गुन्हा घडल्याची बाब निदर्शनास आलेली नाही, अशी माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, राजेंद्रसिंह गौर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.
चाकण औद्योगिक परिसरातील कैलास स्टीलचे व्यवस्थापक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार झाला. एक गोळी पोटात तर एक गोळी पाठीत लागलेली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. अजय सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु असून पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली आहेत.”
– डॉ. शिवाजी पवार (उपायुक्त – पिंपरी – चिंचवड)




