महाळुंगे पोलीस ठाण्याला राज्याच्या गृह विभागाची मंजुरी
![State Home Department approves Shirgaon-Parandwadi Police Station under Pimpri-Chinchwad Police Commissionerate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/police-station-building-exterior-with-police-car-city-police-department-house-facade-vehicle_313242-559.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस ठाण्याला राज्याच्या गृह विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 8) उशिरा अध्यादेश काढण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रावेत, शिरगाव, बावधन, महाळुंगे यासह पाच नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील रावेत पोलीस ठाण्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली. त्यापाठोपाठ आता महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला देखील मान्यता मिळाली आहे.
राज्याच्या वित्त विभागाने खर्चाला मान्यता दिली आहे. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाकडून देखील महाळुंगे पोलीस ठाण्याला मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील मंजूर संख्याबळातून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी पदे मंजूर करण्यात आली आहेत. एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, तीन सहायक उपनिरीक्षक, 10 हवालदार, 13 पोलीस नाईक, 32 पोलीस शिपाई, अशी एकूण 67 पदे उपलब्ध करून देण्यात मान्यता दिली आहे.
तसेच या पोलीस ठाण्यासाठी आणखी आवश्यक असेलेली एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, 12 सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार 20, पोलीस नाईक 22, पोलीस शिपाई 38, सफाई कामगार दोन, अशी एकूण 97 पदे 28 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तीन टप्प्यांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळातून पुरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी, असे अध्यादेशात नमूद केले आहे. तसेच नवनिर्मित महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी येणारा 27 लाख 95 हजार 400 रुपयांचा उर्वरित खर्च पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपलब्ध मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, असे सूचित केले आहे.