ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व सुरक्षेसह विविध प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती : सभापती अभिषेक बारणे

पिंपरी- चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा आणि नागरिकाभिमुख विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, सार्वजनिक सुविधा आणि विकासकामांशी संबंधित निर्णयांमुळे शहरातील मूलभूत सेवा अधिक सक्षम होणार आहेत.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांतील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्यास मंजुरी देण्यात आली. बिजलीनगर, बळवंतनगर, रस्टन कॉलनी, दापोडी, नवी सांगवी आणि जुनी सांगवी परिसरातील कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. यासोबतच सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आधुनिक ऑटो-क्लोरीनेशन सिस्टीम बसविणे, निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांसाठी क्लोरीन गॅस आणि आवश्यक रसायनांची खरेदी यांनाही मंजुरी देण्यात आली. थेरगाव, रहाटणी, पिंपरी, मिलिंदनगर, कैलासनगर, वैभवनगर आणि महात्मा गांधी नगर परिसरातील जलनिस्सारण सुधारणा, नवीन नलिका टाकणे आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही स्थायी समितीने मान्यता दिली.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील या विमानतळाचा कायापालट होणार, केंद्र सरकारकडून आधुनिकीकरणाला मंजूरी

रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासाला चालना

वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करण्यास तसेच पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती व नवीन लाईन टाकण्यास मंजुरी देण्यात आली. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, थेरगाव, बेलठिकानगर आणि रहाटणी परिसरातील रस्ते व फुटपाथ दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती, सद्गुरूनगर, महादेवनगर आणि लांडगेवस्ती भागातील रस्त्यांचे ऑटोमेटेड सर्वेक्षणानुसार डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे. काळेवाडी येथील ज्योतिबा गार्डनमध्ये कुस्तीचा आखाडा उभारण्यास तसेच पिंपळे निलख येथे महिला बाजार हट केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मोकळ्या जागांचे काँक्रीटीकरण आणि इंटरलॉकिंग ब्लॉक बसविण्याच्याही कामांना मंजुरी मिळाली.

आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेलाही बळ

महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत शाळा आणि कार्यालयांसाठी इंटरनेट बँडविड्थ सेवा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. जिजामाता रुग्णालयातील स्थापत्य विषयक कामांनाही हिरवा कंदील मिळाला आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत नव्याने करार करून २१८ सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसाठी तसेच विविध विभागांतील दैनंदिन देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यालाही मंजुरी देण्यात आली. नगररचना योजना राबविण्यासाठी सल्लागार संस्थांना मुदतवाढ देणे तसेच विविध प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली. यामुळे विकासकामांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि गुणवत्तेला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा तसेच मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित विविध विषयांना मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच शहराच्या वाढत्या गरजांनुसार विकासकामे वेळेत पूर्ण करणे यावर महापालिकेचा भर राहणार आहे. विकासकामांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देत शहराच्या सर्व भागांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे,”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button