सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांच्या नृत्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव
![Spontaneous response to the dance of renowned Kathak dancer Dr. Pt. Nandkishore Kapote](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Nandkishore-Kapote-780x470.jpg)
‘विठ्ठल विठ्ठल’ या गीतावर प्रेक्षकांनीदेखील ताल धरला
पिंपरी : भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांनी ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवामध्ये सादर केलेल्या नृत्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांचे बहारदार कथक नृत्य सादर झाले. डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्यास सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा गजरात दाद देत स्वागत केले.
हेही वाचा – राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त फक्त ५५ रूपये लिटरने पेट्रोल वाटप
डॉ.कपोते यांनी कथक नृत्यातील मंदीर परंपरा दाखवून पं.भीमसेन जोशी यांच्या ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या लोकप्रिय भजनावर अभिनय पेश करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पं.बिरजू महाराजांचे तिहाई, तुकडे, परण आदी प्रकार त्यांनी सादर केले. डॉ.कपोते यांनी घुंघरू व तबला यांची जुगलबंदी सादर करुन रसिकांची मने जिंकली तर शेवटी संत तुकाराम महाराजांचे ‘अणु रेणिया थोकडा, तुकाराम आकाशा एवढा’ हे भजन सादर करून कार्यक्रमामध्ये रंग भरला. ‘विठ्ठल विठ्ठल’ या गीतावर प्रेक्षकांनीदेखील ताल धरला.
डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांना तबला साथ मुंबईचे प्रसिद्ध तबलावादक पं.कालिनाथ मिश्रा यांनी केली. तर गायन साथ पं. संजय गरूड, बासरी साथ अझरुद्दीन शेख, पखवाज ज्ञानेश कोकाटे, हार्मोनियम उमेश पुरोहित व पं.यश त्रिशरण यांनी केली.