अध्यात्मिक: श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माण कार्यात हातभार लावूया!
रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी केलेले कार्य इतके महान आहे, की आपण त्याचे उतराई होऊ शकत नाही. परंतु, त्याची जाणीव ठेवून या मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या निर्माण कार्यासाठी भरभरून हातभार लावू शकतो, असे सांगत भंडारा डोंगर मंदिराच्या उभारणीमध्ये प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले.
माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने तुकोबारायांचा जन्मदिन वसंतपंचमी या दिवशी गेली ७१ वर्षे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या सोहळ्याच्या उद्घाटनानिमित्त रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर बोलत होते. पाचपोर महाराजांनी उपस्थित भाविकांना आवाहन करीत सांगितले की, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर सुवर्ण तांबूस दगडात भव्य-दिव्य असे मंदिर निर्माणाचे काम सुरु असून जवळपास ७० टक्के काम आजअखेर पूर्णत्वास आले आहे. हे भव्य-दिव्य मंदिर संपूर्ण देशभरातच एक आकर्षण ठरणार आहे. या देशातील प्रत्येक मंदिर हे जगद्गुरु तुकाराम महाराजांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजेच संतश्रेष्ठ तुकोबाराय; आणि कळसा शिवाय कोणतेच मंदिर पूर्ण होवू शकत नाही.
ते म्हणाले की, ३५० वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तुकाराम महाराजांकडे सावकारी, महाजनकी होती. पुढे महाराजांच्या वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षांपर्यंत आई-वडील, पहिली पत्नी यांचे दुःखद निधन, थोरल्या बंधूंनी विरक्तीतून घेतलेला संन्यास, सतत तीन ते चार वर्षांचा दुष्काळ अशी अनेक संकटे येवून देखील तुकोबारायांनी प्रपंचात न अडकता त्या काळात सुमारे ४ लाखांची गहाणखते इंद्रायणी मध्ये बुडविली व याच भागातील हजारो लोकांची कर्जे माफ केली व पुढे सर् जनसामान्यांच्या कल्याणासाठी अभंग गाथेची निर्मिती केली ती याच पवित्र अशा भंडारा डोंगरावर. आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड या मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होण्यापूर्वी लाखो रुपयांची देणगी या मंदिर निर्माणाच्या कार्याला देऊन उतराई होण्याची नामी संधी आता आली आहे असे महाराजांनी नमूद केले.
हेही वाचा – किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे? कधीपासून सुरू झाली? जाणून घ्या कार्डचे नेमके फायदे…
खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब काळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. मी स्वतः वैयक्तिक आर्थिक देणगी तर देईनच तसेच भंडारा डोंगरावर येणार्या भाविकांना सर्व सुख सोयी उपलब्ध होण्यासाठी शासन पातळीवर विशेष प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
या सोहळ्यात सकाळी जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपिठाचे प्रमुख ह.भ.प.नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गाथा पारायणाचा शुभारंभ झाला. या गाथा पारायणासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथील हजारो भाविक वाचक म्हणून सहभागी झाले आहेत. या पारायण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब काळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, माजी पं.स.सभापती विठ्ठल शिंदे, माजी पं.स.सदस्य शिवाजी वर्पे, खेड तालुका शिवसेना शाखाप्रमुख व राजगुरू सहकारी बँकेचे संचालक रामदास धनवटे, किसनराव कराळे पाटील, रामभाऊ कराळे पाटील, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे, उद्योजक गजानन शेलार, ह.भ.प. रविंद्र महाराज ढोरे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवीअप्पा भेगडे व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
काकडा आरती संपन्न झाल्यानंतर पहाटे ५.३० वाजता माजी आमदार स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या कुटुंबियांच्यावतीने श्री विठ्ठल – रुक्मिणी व जगद्गुरु तुकोबारायांना अभिषेक करून महापूजा करण्यात आली.