‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना धडा शिकवू’; सतीश काळे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरे टोप घालण्याचा केला निषेध
![Satish Kale said that he will teach a lesson to Praful Patel who insulted Chhatrapati Shiv Rai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Satish-Kale-780x470.jpg)
पिंपरी | जिरे टोप ही छत्रपती शिवरायांची ओळख आहे.तर शिवछत्रपती हे संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे.मात्र शिवरायांचा जिरे टोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालून शिवरायांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शिवरायांच्या अवमान प्रकरणी पटेल यांनी त्वरित महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.अन्यथा त्यांना संभाजी ब्रिगेड धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.
काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवरायांच्या कार्यापासून महाराष्ट्रासह देश प्रेरित आहे. महाराजांनी घालून दिलेला आदर्श अनेक जण जपत आहेत. महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषा हे प्रतीक आहे. त्या प्रतिकांचा अवमान हे छत्रपती शिवरायांचा अवमान मानतो. हा अवमान करण्याचे काम राष्ट्रवादीतून गद्दारीचा शिक्का घेऊन बाहेर पडलेले प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरे टोप घालून त्यांची मर्जी सांभाळण्याचा अट्टाहास पटेल यांचा दिसतो. राजकीय चापलुसी करताना त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचा विसर पडल्याचे दिसते.
राजकीय दृष्ट्या भरकटलेल्या या प्रफुल्ल पटेल यांनी भावना दुखावल्याप्रकरणी त्वरित महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा पुण्यासह महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. तसेच त्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकविणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला.