‘संभाजी ब्रिगेड’चे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ पुरस्काराने गौरव
पिंपरी : विद्रोही कृती समिती,नाशिक यांच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी करण्यात आलेल्या ‘बळीराजा गौरव दिन’ महोत्सवात पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विचारवंत उपस्थित होते.
नाशिकच्या विद्रोही कृती समितीच्या वतीने दर वर्षी बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी ‘बळीराजा गौरव दिन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नशिक मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने बळीराजाची भव्य रांगोळी काढण्यात आली. तसेच ‘बळीराजाचा इतिहास आणि आज’ या विषयावर परिवर्तनवादी साहित्यिकांनी आपले विचार मांडले. यानंतर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक चळवळीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार स्विकारल्यानंतर सतीश काळे म्हणाले की, विद्रोहीरत्न’ पुरस्काराने मी भारावून गेलो. आपल्या कार्याचं कुणीतरी मुल्यांकन करतंय हे पाहून आनंद वाटला. या पुरस्कारासाठी निवड म्हणजे एक सोनेरी क्षणच आहे. याबद्दल आयोजक समितीचे आभार मानतो. दर वर्षी नाशिक शहरातील सर्व पुरोगामी पक्ष-संघटना ‘बळीराजा गौरव दिन’ बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करतात. हे पाहून खूपच आनंद झाला. असे महोत्सव महाराष्ट्रभरासह देशात साजरे केले जाणे आवश्यक आहे. कष्टकऱ्यांच्या,वंचितांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा केला जावा. यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सतीश काळे यांचा अल्प परिचय
संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे व राजेश गुंड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण केल्यामुळे नाशिक येथे भरविण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सुरक्षा कवच भेदत लेखक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासून निषेध व्यक्त केला होता. सतीश काळे गेल्या पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेड या पुरोगामी चळवळीत सक्रियपणे कार्यरत आहेत. मा.न्यायमूर्ती बी.जी कोळसे-पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, प्रविण गायकवाड, गंगाधर बनबरे, डॉ.श्रीमंत कोकाटे अशा अनेक विचारवंताच्या तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्व आहेत. काळे यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर अनेक आक्रमक आंदोलने करीत सरकारला जाब विचारला. पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा हटाव या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, शिवनेरी किल्ल्यावरील मराठा आरक्षणाचे आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री.श्री.रविशंकर यांच्या विरुद्ध अनेक आंदोलने केली आहेत तसेच संभाजी बीडी चे नाव बदलण्यात यावे,यासाठी आक्रमक आंदोलन करीत अखेर संभाजी बीडीचे नाव बदलण्यात आले. काळे यांनी 2017 साली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरुन उडी मारुन आत्मबलिदानाचा इशारा दिला होता, त्यावेळी काळे यांच्याह दहा कार्यकर्त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले होते. तसेच काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी ‘रक्तदान शिबीर’ तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन करीत असतात.