निवृत्त पोलिसाच्या मारहाणीत सराईताचा मृत्यू
पुणे |महाईन्यूज|
गुटख्याची पुडी न दिल्याच्या कारणावरून निवृत्त पोलिसाला मारहाण करणे एका सराईताच्या जिवावर बेतले आहे. निवृत्त पोलिस आणि सराईतामध्ये झालेल्या हाणामारीत सराईताचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.१२) रात्री सातच्या सुमारास खडकीतील बाराथे वस्तीवर हा प्रकार घडला. या प्रकरणी निवृत्त पोलिसावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय ६१, रा. जुनी सांगवी) असे या निवृत्त पोलिसांचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मनीष काळुराम भोसले (वय २२, रा. बाराथे वस्ती, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हनुमंत भोसले (वय ५८) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हाळ हे पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. घटनेच्या दिवशी ते बाराथे वस्तीवर दुचाकीवर चालले होते. त्यावेळी मनीष भोसले याने त्यांना अडवले व गुटख्याची पुडी मागितली. त्यावेळी ओव्हाळ यांनी त्याला पुडी नसल्याचे सांगितले. त्यामुळे मनीषने त्यांना मारहाण करण्यात सुरवात केली. त्यानंतर ओव्हाळ दुचाकीवरून उतरले व त्यांची मनीषसोबत झटापट केली. या मारहाणीत मनीष खाली पडल्यानंतर ओव्हाळ यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे मनीषचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी यांनी दिली.





