रुपीनगर- तळवडेतील फ्लेक्सवरुन होर्डिंग मालकाची पोलीसात तक्रार!
बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावून राजकीय हेतूने दमदाटीचा प्रयत्न
पिंपरी : रुपीनगर- तळवडे येथे होर्डिंगवर जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावून होर्डिंग मालकाला दमदाटी केल्याची तक्रार देहुरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत होर्डिंग मालक प्रदीप साहेबराव मोटे यांनी तक्रार अर्ज केला आहे.
देहुरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आकाश चिन्ह परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेवून माझ्या शुभम ॲडर्व्हटायझिंग या संस्थेच्या माध्यमातून तळवडे चौक येथे तीन होर्डिंगची नोंदणी केली आहे. या ठिकाणी होर्डिंगला असलेले ‘लॉक’ तोडून काही व्यक्तींनी स्वत:चे राजकीय हेतूने फ्लेक्स लावले आहेत.
सदर फ्लेक्स काढून घेण्याची विनंती संबंधितांना केल्यानंतर मला जबरदस्तीने आणि शिवीगाळ करून ‘‘आम्ही लावलेले फ्लेक्स काढायचे नाहीत… ’’ अशी धमकी देण्यात आली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी फ्लेक्स काढण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी स्थानिक तरुणांनी येवून माझ्यावर दमदाटी केली. हातात काठ्या घेवून दहशत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही राजकीय वाद नको म्हणून माझ्या सहकाऱ्यांसोबत रात्री उशीरा फ्लेक्स काढण्याचे ठरवले. पण, त्यावेळीसुद्धा माझ्या सहकाऱ्यांना धमकी देवून तिथे शिवीगाळ करुन निघून जाण्यास सांगण्यात आले.
स्थानिक व्यक्तींकडून धमकी…?
बेकायदेशीरपणे, जबरदस्तीने आणि राजकीय हेतूने लावलेल्या फ्लेक्समुळे परिसरात नाहक तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने माझ्या होर्डिंगचे ‘लॉक’ तोडून लावलेले फ्लेक्स काढावेत, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. संबंधित स्थानिक काही लोकांनी माझ्या सहकाऱ्यांना धमकी दिली आहे. तसेच, शिवीगाळ करुन माझ्या होर्डिंगचे लॉक तोडले आहे. तसेच परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधितांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंतीही प्रदीप मोटे यांनी पोलिसांना व महापालिका आयुक्तांना केली आहे.