क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे ‘गुणवत्ता व्यवस्थापन कन्व्हेन्शन-२०२६’ उत्साहात
शिक्षण विश्व: ३८ उद्योगसंस्थांमधील ४८१ स्पर्धकांचा सहभाग; गुणवत्ता सुधारणेच्या संकल्पनेवर भर
पिंपरी-चिंचवड : विविध उद्योग संस्थांमधील उत्पादने, सेवा आणि कार्यप्रक्रियांच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा घडवून ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेले ‘गुणवत्ता व्यवस्थापन कन्व्हेन्शन-२०२६’ उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडले. भोसरी येथील एक्सलन्स सेंटरमध्ये झालेल्या या कन्व्हेन्शनमध्ये ३८ उद्योगसंस्थांमधील तब्बल ४८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून गुणवत्ता व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उपक्रमांचे सादरीकरण केले.
या कन्व्हेन्शनमध्ये केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर या तीन गटांमध्ये एकूण १९५ नामांकने प्राप्त झाली होती. सहभागी उद्योगसंस्थांच्या सदस्यांनी गुणवत्ता सुधारणा, उत्पादकता वाढ, ग्राहक समाधान आणि कार्यक्षम व्यवस्थापन यासंदर्भातील विविध विषयांवर आपले कौशल्यपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.
कन्व्हेन्शनचे उद्घाटन बॉश चेसिस सिस्टिम्स इंडिया कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी जगदीप सिंग बिरदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियलचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या संघांना गुणवत्तेच्या निकषांवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे शाखा परिषद सदस्य माधव बोरवणकर, पवनकुमार रौंदळ, धनंजय वाघोलीकर तसेच परवीन तरफदार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील केस स्टडी सादरीकरणाचे मूल्यमापन अजय अंबिके, प्रभाकर चोपडे, ऋतू मेहता, धनंजय वाघोलीकर, पंकज बडगुजर, पवन गुजराती, संजय लकडे, चंद्रशेखर बापट, प्रशांत मुधळवाडकर, व्यंकटेश राव, विठ्ठल वाघचौरे, पवनकुमार रौंदळ आणि माधव बोरवणकर यांनी केले. तर स्लोगन आणि पोस्टर गटांचे मूल्यमापन राहुल गुरुळे आणि ललिता परदेशी यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी कन्व्हेन्शनच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
गुणवत्ता व्यवस्थापनाच्या माध्यमातून उद्योगांनी अधिक परिणामकारक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी अशा कन्व्हेन्शनची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सहभागी संस्थांनी आपले विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करत उद्योग क्षेत्रात गुणवत्ता संस्कृती अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.





