डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीचे प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश
शिक्षण विश्व: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड

पिंपरी- चिंचवड : गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या बळावर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये प्लेसमेंटच्या क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये संकुलातील विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यंदा विद्यार्थ्यांनी सरासरी ६ ते १५ लाख रुपये वार्षिक (एलपीए) वेतन पॅकेज मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये संकुलातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, पीजीडीएम तसेच पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती विविध प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
व्होडाफोन, दीपक फर्टिलायझर्स, बीएनवाय मेलॉन, कॅपजेमिनी, फोर्स मोटर्स, विप्रो, डसॉल्ट सिस्टिम्स, गोदरेज, सुल्झर, किर्लोस्कर, बॉश, एचएसबीसी टेक्नॉलॉजी, इन्फोब्लॉक्स, आरटीकॅम्प, पॉलीकॅब आणि ह्युंदाई इंडिया यांसारख्या नामांकित कंपन्यांनी संकुलातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गतवर्षी विद्यार्थ्यांनी २७ लाख रुपये वार्षिक (एलपीए) इतके सर्वोच्च वेतन पॅकेज मिळवून दिलेल्या उज्ज्वल परंपरेचा वारसा यंदाही कायम राखण्यात यश आले आहे.
हेही वाचा – अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वाटचाल गौरवास्पद : खा. सुनील तटकरे
विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या अपेक्षा, आधुनिक भरती प्रक्रियेतील बदल आणि प्लेसमेंटसाठी आवश्यक कौशल्यांची माहिती मिळावी, यासाठी अभियांत्रिकी, एमबीए आणि पीजीडीएम विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एचआर सिम्पोजियमचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजा, कौशल्याधारित भरती प्रक्रिया, करिअर नियोजन तसेच प्रभावी मुलाखत तंत्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटकडे पाहण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. त्यामुळेच उद्योगविश्वाच्या अपेक्षांनुसार सक्षम आणि कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविण्यात संकुल सातत्याने यशस्वी ठरत आहे.
या उल्लेखनीय यशासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, ट्रस्टी तेजस पाटील, कॅम्पस संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), प्राचार्य, डीन प्लेसमेंट्स प्रा. जस्मिता कौर तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाचे पंख देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची उज्ज्वल परंपरा जपणारे शैक्षणिक केंद्र म्हणून डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख अधोरेखित केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि कौशल्याधारित जगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट नाही, तर त्यांना जागतिक स्तरावर सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि उद्योगविश्वाच्या अपेक्षांना पूर्ण करणारे व्यावसायिक म्हणून घडविणे ही आमची बांधिलकी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि उद्योग क्षेत्राशी असलेली भक्कम भागीदारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेचे फलित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना यशाचे पंख देत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यास सक्षम करणे, हेच आमचे ध्येय राहील.”
— डॉ. संजय डी. पाटील, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी, पुणे





