सदनिका दस्तनोंदणी झाल्यानंतर मालमत्ताकर लागू

पिंपरी : नोंदणी व मुद्रांक विभागाचे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी जोडणी (इंटिग्रेशन) पूर्ण झाली आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्रीबाबतच्या दस्त नोंदणीबाबतची माहिती संगणक प्रणालीच्या माध्यमातून थेट महापालिकेला उपलब्ध होत आहे.
यामुळे आता मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुध्दा तत्काळ होणार आहे. त्यासाठी नव्याने हस्तांतरण प्रक्रिया करावी लागणार नाही तसेच नोंदणी दस्त झालेली प्रत्येक मालमत्तेला मालमत्ताकर लागू होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
या संदर्भात ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अखेर, ती प्रक्रिया सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रक्रियेमुळे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण होणारा विलंब टाळला जाऊन मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया गतिमान होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन सेवेद्वारे आपोआप होणार असल्यामुळे नागरिकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
हेही वाचा – ‘महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रिपोर्ट कार्ड जारी
नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणासाठी अर्ज केला नाही तरी हस्तांतरण प्रक्रिया मुदतीत पार पडणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाकडून उपलब्ध होणार्या ऑनलाइन माहितीच्या आधारे महापालिकेस मालमत्ता विक्री करणार, मालमत्ता खरेदी करणार, मालमत्ता नोंदणी दिनांक व मालमत्तेचा व्यवहाराचा तपशील प्राप्त होणार आहे.
महापालिका सर्वप्रथम मालमत्ता विक्री करणाऱ्याचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव, विक्री मालमत्तेचा संपूर्ण तपशील तपासणार आहे. तपशील अचूक भरल्याची खात्री झाल्यानंतर नवीन किंवा जुन्या सदनिका, गाळा, बंगलो, रो हाऊस व इतर मालमत्तेचे बाजारमूल्य किंवा मुद्रांक शुल्क ज्या रकमेवर भरणा केला आहे, त्यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेवर 0.50 टक्के इतके मालमत्ता हस्तांतरण शुल्क लावले जाईल. ती रक्कम ऑनलाइन स्वरुपात भरणा करण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे.
मालमत्ताधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे मालमत्ता हस्तांतरण शुल्काची रक्कम तात्काळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरणा करावी. शुल्काच्या भरणा मुदतीत न केल्यास मालमत्ताकराच्या पुढील बिलामध्ये हस्तांतरण शुल्काचा समावेश करण्यात येणार आहे. याचबरोबर, यापुढे ज्यांना मालमत्ता खरेदी किंवा मालमत्ता विक्री करावयाची आहे अशा नागरिकांनी मालमत्तेच्या दस्ताची नोंद करताना आपला मालमत्ता क्रमांक नमूद करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.





