‘नवरात्र उत्सव शांततेत, आनंदात पार पाडावा’; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी : आगामी नवरात्र उत्सव नागरिकांनी शांततेत व उत्साहात पार पाडावा, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक त्यांनी घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना नवरात्र उत्सावात काय काळजी घ्यावी, याबाबत सूचना केल्या.
शहरातील तीन पोलीस उपायुक्त कार्यालयांना पोलीस आयुक्त चौबे यांनी भेट दिली. यावेळी पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, डॉ शिवाजी पवार, सहायक आयुक्त सचिन हिरे, मुगुटराव पाटील, राजेद्रसिंह गौर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते.
हेही वाचा – सुवर्णकार समाजाची भावना: आमदार महेश लांडगेच्या सहकार्यामुळे ‘‘आजि सोनियाचा दिनु..’’
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळणाऱ्या ठिकाणी व आजूबाजूचे परिसरात आवश्यक तो बंदोबस्त लावण्यात यावा. आवश्यक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. दांडिया, गरबा खेळणाऱ्या ठिकाणी व इतरत्र महिला व लहान मुलींचे बाबतीत छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मंडळांनी देवीची मुर्ती, दांडिया, गरबा खेळण्याच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत. मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीची ठिकाणांवर पेट्रोलिंग वाहने, बीट मार्शल्स तसेच गुन्हे शोध पथकामार्फत गस्त घालावी.
आयुक्त पुढे म्हणाले की, देवीची मिरवणुक मार्ग, दुर्गा दौड मार्गांची तपासणी करावी. तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. दररोज गर्दीचे ठिकाणी पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी पायी गस्त घालतील. तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.