पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सप्तर्षी फाउंडेशनच्या दिव्यांग क्षेत्रातील कार्याची घेतली दखल
सप्तर्षी फाउंडेशनचे भारतातील पहिले इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन संकल्पनेची निर्मिती
![Pimpri, Chinchwad, Municipal Corporation, Saptarshi, Foundation, Divyang, Area, Work, Intervention,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/divyanga-dina-780x470.jpg)
पिंपरी : 3 डिसेंबर 2024 रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सप्तर्षी फाउंडेशनच्या दिव्यांग क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन श्री.मनोजकुमार साहेबराव बोरसे यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील सर सहाय्यक आयुक्त श्री तानाजी नरळे श्री श्रीनिवास दांगट सर यासोबत दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा निवृत्त सनदी अधिकारी श्री. ओमप्रकाश देशमुख सर , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परेश गांधी तसेच विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना विविध शासकीय व खाजगी सेवा सुविधा एका क्लिकवर एका छताखाली त्यांच्या दारात उपलब्ध व्हावी यासाठी सप्तर्षी फाउंडेशनने भारतातील पहिले इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन या नावीन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती करून प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील केली आहे. सदर प्रकल्प हा भारतातील अशा पद्धतीचा पहिला प्रकल्प असून याची व्यापक स्वरूपात अंमलबजावणीची सुरुवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्हावी यासाठी प्रशासनासोबत समन्वय चालू असल्याचे श्री मनोजकुमार बोरसे यांनी कळवले.
याव्यतिरिक्त सप्तर्षी फाउंडेशन ने आज पर्यंत शेकडो दिव्यांग बालकांना मोफत औषध उपचार मिळण्यासाठी 14 शिबिरे गेली तीन वर्षात आयोजित केले आहे. चौदावे शिबिर नुकतेच 24 नोव्हेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन, मोरवाडी येथे आयोजित केले होते. सदर शिबिरात 164 दिव्यांग बालकांवर उपचार करण्यात आले.
सप्तर्षी फाउंडेशनने आजपर्यंत केलेल्या कार्यासाठी विविध संस्था व व्यक्तींनी केलेल्या सहयोगामुळे तसेच दिव्यांग बालकांच्या व बांधवांच्या आशीर्वादाने आजपर्यंत हे कार्य पार पडू शकले अशी भावना श्री. मनोजकुमार बोरसे यांनी व्यक्त केली. संस्थेच्या वतीने प्रशासकीय प्रमुख वृषाली बोरसे , कार्यालयीन समन्वयक श्री. अश्विन वाल्हेकर , स्वयंसेवक समन्वयक श्री. सतीश ढगे यासोबतच संस्थेचे अनेक सदस्य, दिव्यांग बालक व कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते.