कार्तिकी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज! पंढरपूर यात्रेसाठी १ हजार जादा बसेस धावणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विशेष नियोजन; चंद्रभागा बसस्थानकातून राज्यभरासाठी जादा बसफेऱ्या, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतींचा लाभ

मुंबई : २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होत असून, यानिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे १ हजार जादा बसेस सज्ज ठेवल्या आहेत. या माध्यमातून भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
चंद्रभागा बसस्थानकातून राज्यभरासाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन, बसफेऱ्यांचे व्यवस्थापन आणि प्रवाशांची सुरक्षितता यांना प्राधान्य देत महामंडळाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
हेही वाचा – प्रभादेवीतील रेल्वे वसाहतीवरील तोडक कारवाईला स्थगिती; एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रहिवाशांना दिलासा!
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटात सवलत
एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत मिळते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
भक्तीचा प्रवास असो किंवा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध असल्याचा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.
कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून या दिवशी जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात. चंद्रभागेच्या तीरावर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा उत्सव अनुभवायला मिळतो.




