Pimpri : भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनाने निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/101886506_870192963464556_3313801808438099968_n.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांची कोरोनाच्या विरोधातील लढाई अयशस्वी ठरली. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी आज शनिवारी (दि. 26) अखेरचा श्वास घेतला.
प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून लक्ष्मण उंडे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले. त्यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मधुमेह देखील होता.
कोरोनाने शहरातील तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख आता भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. माजी महापौर रंगनाथ फुगे, माजी नगरसेवक साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड या चार माजी नगरसेवकांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे.