वेग वाढल्यास दंड, कमी केल्यास अपघात

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगतीवरील घाट परिसरात वेग मर्यादा दर्शविणारे फलक मोजक्याच ठिकाणी बसविल्याने चालकांना वाहनाचा वेग अचानकपणे कमी करावा लागत आहे; मात्र मागून आलेल्या वाहनांच्या वेगावर आवर घालणे मुश्किल होते व अशाप्रसंगी अपघाताच्या घटना घडतात; तसेच वाहन चालकांना वाहतूक नियमभंग केल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा 100 किमी प्रतितास, तर इतर वाहनांसाठी 80 किलो मीटर प्रतितास आहे; मात्र भरधाव जाणार्या वाहनचालकांना घाट परिसरात अचानकपणे प्रतितास 60/ 40 ची वेग मर्यादा असल्याचे फलक दिसल्याने वाहनांवर नियंत्रण आणणे कठीण होते. वेग कमी केल्यास मागून आलेली वाहने धडकण्याचे प्रकार घडत आहेत; तसेच वाहनांचा वेग कमी न केल्यास वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने नाईलाजास्तव दोन हजार रूपये दंड भरावा लागत आहे.
हेही वाचा – ‘बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे’; रामदास आठवले
द्रुगगती मार्गावर वेग मर्यादेबाबतचे फलक अगदी कॅमेराजवळ ; तसेच मोजक्याच ठिकाणी लावल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहन चालकांना दंड भरावा लागत आहे. त्यामुळे द्रुतगतीवरील घाट परिसरात जागोजागी वेग मर्यादेबाबत सूचना फलक आणि डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.
वाहनचालकांची मागणी
एमएसआरडीसी यांनी घाट मार्गाचा पुन्हा सर्वे करून पुन्हा वेग मर्यादा ठरविणे गरजेेचे असून ती वाढविण्यात यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे. अन्यथा घाट परिसर मार्गातून वाहने गेल्यानंतर वाहन चालकांना विनाकारण दंड भरावा लागणार आहे





